d

WE ARE BRIDGE OF TALES

Let’s Work Together

Mahim – Mumbai 400016

आलोक मराठी नियतकालिक

मुक्त म्हणजे काय?

आलोक हे मराठीतले पहिले मुक्त मासिक आहे असे आम्ही म्हणत असताना, कोणतीही सामग्री मुक्त असणे म्हणजे काय ह्याची ओळख आलोकच्या वाचकांना व लेखकांना असायला हवी म्हणून हा लेख लिहिण्यात आला आहे. क्रिएटिव्ह कॉमन्स ह्या संस्थेच्या परवान्यांमध्ये असणारी कलमे व त्यांचे अर्थ इथे थोडक्यात स्पष्ट करण्यात आले आहेत. हे काम क्रिएटिव्ह कॉमन्सच्या श्रेयनिर्देशन-समवितरण ४.० आंतरराष्ट्रीय परवान्यांतर्गत वितरित केले जात आहे.

१. प्रतिमुद्राधिकार

प्रतिमुद्राधिकारांकरिता कॉपी+राईट ह्या इंग्रजी शब्दाचे शब्दाचे प्रत+अधिकार असे शब्दशः भाषांतरदेखील वापरले जाते, परंतु इंग्रजी संज्ञांमध्ये राहून गेलेले काही आवश्यक अर्थ स्थानिकीकरण करताना सामावून घेता येतात. प्रत ही केवळ लेखनव्यवहारात असते, प्रतिमुद्रा ही गायन, नाट्य, चित्रपट अशा अनेकविध कलाकृतींची असू शकते. कायद्यात ह्या सर्व कलाकृतींचा समावेश असल्यामुळे कॉपीराईटकरिता प्रतिमुद्राधिकार हा शब्दच अधिक सयुक्तिक ठरतो. भारतीय प्रतिमुद्राधिकार कायदा, १९५७ मधील “काम” ह्या शब्दाच्या व्याख्येप्रमाणे कोणतेही काम वितरित करण्याबाबतचे काही नियम प्रतिमुद्राधिकारांमार्फत सांगण्यात आले आहेत. प्रतिमुद्राधिकारधारकास ह्या कायद्यामार्फत काही हक्क प्राप्त होतात. त्यातील सर्वात कळीचा हक्क आहे कामाच्या वितरणाचा हक्क. एखाद्या सामग्रीचे वितरण कोणी करावे हा निर्णय त्या सामग्रीचे प्रतिमुद्राधिकार असलेली व्यक्तीच ठरवू शकते. साहित्यक्षेत्रात लेखकांच्या कलाकृतीचे प्रतिमुद्राधिकार प्रकाशकांकडे असल्यामुळे लेखकांना होणारा त्रास सर्वश्रुत आहे. मुक्त संस्कृतीत प्रतिमुद्राधिकाराशी कोणतेही वैर बाळगण्याचे कारण नाही. उलट प्रतिमुद्राधिकारांचा तिथे आदरच केला जातो. प्रतिमुद्राधिकारांचा वापर कशाप्रकारे केला जातो, ह्यानुसार त्यांचे परवाने ठरतात. कोणत्याही इतर कलमाखेरीज केवळ © ह्या चिन्हासह वितरित केल्या जाणाऱ्या कामाचे “सर्व हक्क सुरक्षित” असतात. अशी ओळदेखील आपण अनेकदा वाचतो. ह्या “सर्व”मध्ये नेमके कोणते हक्क असतात ह्याची आपण फारशी शहानिशा केली नसते. ह्या निमित्ताने त्याची माहिती करून घेऊयात. १६ डिसेंबर, २००२ रोजी क्रिएटिव्ह कॉमन्स ह्या अमेरिकास्थित संस्थेने हे परवाने प्रकाशित केले. त्या परवान्यांमध्ये विविध कलमे वापरली जातात व त्यांचे पुढीलप्रमाणे अर्थ होतात.

२. क्रिएटिव्ह कॉमन्स

क्रिएटिव्ह कॉमन्स ह्या संस्थेचा कोणताही परवाना असो, त्याचा सर्वात प्राथमिक नियम म्हणजे ह्या परवान्याचे कोणतेही काम कोणीही वितरित करू शकते. त्याचे वितरण थांबवता येत नाही. इथे एक गोष्ट नमूद करायला हवी की क्रिएटिव्ह कॉमन्सचा परवाना असलेली सामग्री विकता येऊ शकते. मुक्त सामग्री फुकटच विकायला हवी असे बंधन नाही. क्रिएटिव्ह कॉमन्स संस्थेचा कोणताही परवाना वापरावयाचा असल्यास त्या सामग्रीस हे चिन्ह लावले जाते.

३. श्रेयनिर्देशन

मुक्तपणे वितरित केल्या जाणाऱ्या सामग्रीमध्ये सगळ्यात मोठा धोका उद्भवतो, तो म्हणजे आपण केलेल्या कामाचे श्रेय न मिळण्याचा. क्रिएटिव्ह कॉमन्सच्या परवान्यांमध्ये ह्याचा विचार झालेला आहे. काही विशेष परवाने वगळता सर्वच परवान्यांमध्ये श्रेयनिर्देशनाची सक्ती आहे. काही परवान्यांमध्ये ते वगळण्यात आले आहे, त्याकरिताही काही कारणे आहेत. एरवी श्रेयनिर्देशनास पर्याय नाही.

४. स्थायी

स्थायी हे कलम परवान्यासोबत जोडल्यास त्या सामग्रीत कोणताही बदल करता येत नाही. मुक्त संस्कृतीतील निकषांनुसार सामग्रीत बदल करण्याचे स्वातंत्र्य नसेल, तर त्या सामग्रीस मुक्त म्हणता येत नाही. त्यामुळे हे कलम असलेली सामग्री मुक्त मानली जात नाही.

५. अव्यावसायिक

अव्यावसायिक हे कलम परवान्यात वापरल्यास त्या सामग्रीचा व्यावसायिक वापर करता येत नाही. मुक्त संस्कृतीतील निकषांनुसार सामग्रीच्या व्यावसायिक वापरावर बंधने आणली असल्यास त्या सामग्रीस मुक्त म्हणता येत नाही, त्यामुळे हे कलम असलेले परवानेदेखील मुक्त ठरत नाहीत.

६. समवितरण

समवितरण ह्या कलमाचा अर्थ होतो सामग्रीचे वितरण कोणीही करू शकते, परंतु वितरकावर ती सामग्री मुक्त व मूळ परवान्यातील कलमांसह वितरित करण्याचे बंधन आहे. उदा. एखादी सामग्री अव्यावसायिक व समवितरण ह्या कलमांसह वितरित होत असेल, तर तिचे पुनर्वितरण करणाऱ्यास तिचा व्यावसायिक वापर करता येत नाहीच, शिवाय ह्याच अटींसह सामग्रीचे वितरण करावे लागते. ह्या कलमास मुक्त चळवळीत खूप महत्त्वाचे स्थान आहे.

७. शून्य

शून्य परवाना एखाद्या सामग्रीसाठी तेव्हाच वापरला जातो, जेव्हा एखाद्या कामाचे वितरण करताना त्याच्या निर्मात्याचा निर्देश करणेदेखील बंधनकारक नसावे अशी ती सामग्री निर्माण करणाऱ्याची इच्छा असते. ह्या परवान्याद्वारे वितरित होणाऱ्या सामग्रीचा वापर करण्यासाठी कोणतेच बंधन उरत नाही.

८. सार्वजनिक

ज्या सामग्रीचे कोणतेच हक्क सुरक्षित नाहीत अशी तुम्हास खात्री आहे त्याच सामग्रीस सार्वजनिक असे चिन्हांकित करावे. हा कायदेशीर परवाना नसून केवळ एक निशाण आहे. ज्यावर कोणाचेही मालकी अधिकार नाहीत अशा कोणत्याही सामग्रीला हे चिन्ह लावता येऊ शकते. शून्य परवान्याचे व ह्याचे परिणाम साधारण सारखेच आहेत, परंतु शून्य परवाना ते परिणाम साधण्यासाठी कोणाकडून तरी जाणीवपूर्वक लावला जातो. सार्वजनिक सामग्री कोणत्याही परवान्याशिवाय मुक्तच असते. ह्या दोन्ही परवान्यांतील फरक इथे वाचा.

९. परवाने

क्रिएटिव्ह कॉमन्स परवाने
परवाना चिन्हे बदल व्यवसाय श्रेय वितरण समवितरण मुक्त?

क्रिकॉ-श्रेय-अव्या-स्थायी

नाही

क्रिकॉ-श्रेय-स्थायी

नाही

क्रिकॉ-श्रेय-अव्या-सवि

नाही

क्रिकॉ-श्रेय-अव्या

नाही

क्रिकॉ-श्रेय-सवि

होय

क्रिकॉ-श्रेय

होय

क्रिकॉ ०

होय

संक्षेप = क्रिकॉ (क्रिएटिव्ह कॉमन्स), अव्यावसायिक (अव्या), सवि (समवितरण), श्रेय (श्रेयनिर्देशन)                                                                                                                                                             स्रोत

संक्षेप = क्रिकॉ (क्रिएटिव्ह कॉमन्स), अव्यावसायिक (अव्या), सवि (समवितरण), श्रेय (श्रेयनिर्देशन)