d

WE ARE BRIDGE OF TALES

Let’s Work Together

Mahim – Mumbai 400016

Image Alt
Issue 1

mag pralekh

आजच्या काळातील कलाविषयक दृष्टिकोन

     मी एकदा पुण्याला गेलो होतो. डेक्कनला पायी फिरत असताना फुटपाथवर जी पुस्तकं विकायला असतात ती पाहत हळू हळू चालत होतो. त्यावेळी एका पुस्तकाने मला थांबायला भाग पाडलं. कॅनव्हासच जाडंभरड कव्हर त्यावर कोणताही चित्र नाही…कॅनव्हास आहे पण चित्र नाही! हा काय गंमतीशीर प्रकार आहे बघूया म्हणून मी पुढे गेलो कव्हरवर मला अपरिचित लेखकाचं नाव होतं मी पुस्तकाची किंमत विचारली तर फक्त २० रुपये म्हणून ते घेतलं देखील. कॅनव्हासच कव्हर पण त्यावर चित्र नाही पण नाव होत; ‘चेखोव’ च्या निवडक लघुकथा. पाहिलंच पान, पहिलीच कथा, चेखोव लिहितो – माझ्यापाशी जर खूप खूप पैसे असते तर खेड्यामधील आजारी शिक्षकांसाठी मी एक सोनेरियम बांधलं असत. त्या इमारतीत भरपूर प्रकाश खेळविण्याची सोय केली असती. मोठमोठ्या खिडक्या ठेवल्या असत्या, उंच उंच छते बांधली असती. आणि एक सुरेख ग्रंथालय निर्माण केलं असतं. सगळ्या प्रकारची संगीत वाद्य ठेवली असती, एक मधुमक्षिकालाय, भाजीपाल्याचा वाफा आणि एक फळबाग. शेतीविषयक, हवामानविषयक, शास्त्रविषयक व्याख्याने ठेवली असती. अशा खूप गोष्टी केली असत्या. भल्या गृहस्था, शिक्षकांना सर्व काही माहित असलं पाहिजे – सगळं सगळं!

     पुस्तकाच पहिलंच पान. शिक्षक म्हणून माझं पहिलंच वर्ष. तेराव्या शतकातील हा लेखक, विसाव्या शतकाच्या मध्यात त्याच लेखन मराठीत अनुवादित होतं, एकविसाव्या शतकातल्या मला तो डेक्कनच्या फूटपाथवर भेटतो (इथे “ते पुस्तकं सापडतं” हा शब्दप्रयोग योग्य असला तरीही). एवढा मोठा काळ माझ्यासमोरून एक क्षण होऊन जातो. मला एक नवी दृष्टी देऊन जातो.

     दृष्टिकोन हा घडत जातो, विकसित होतो. या साठी वेगळ्या वाटा, साहित्याशी अफाट मैत्री आणि चिंतन हवं. वेगवेगळी पुस्तकं, कलाविष्कार, लेखक-कलाकार आपल्याला भेटत जातात, आपलं अनुभवविश्व समृद्ध करत जातात.आणि त्यातून कलाविषयक समज, दृष्टीकोन प्रगल्भ होत जातो.

    पॉल गोंग म्हणतो, “मला जेव्हा काही पाहायचं असत त्यावेळी मी डोळे बंद करतो.” वर्षाच्या पस्तिसाव्या वर्षी आर्थिक सुबतात, कला क्षेत्रात झालेली प्रगती हे सर्व सोडून अलिप्तपणाने एका बेटावर तो चित्र काढत राहिला. त्याच जग म्हणेज फक्त त्याची कला.

    कला म्हणजे नेमकं काय ? तिची अचूक परिभाषा काय ? ह्या प्रश्नांची उत्तरे सहसा देणं कायमच टाळलं तरी जात अथवा ढोबळ मामाने उत्तर रेटल तरी जात. आजच्या काळातील कलाविषयक दृष्टीकोनाची चर्चा करीत असताना मला इथे काही प्रश्न उपस्तिथ करावेसे वाटतात, एक म्हणजे कला क्षेत्रात यश मिळणं म्हणजे नेमकं काय आणि ते कोणत्या कसोट्यानी तपासून पाहायचं? आणि दुसरा म्हणजे कला श्रेष्ठ कि कलाकार? एखादा चित्रकार प्रसिद्ध झाला म्हणून त्याची सारीच चित्र ‘ग्रेट’ ठरतात का? माझा मित्र निखिल मला नेहमी म्हणतो कि पाश्चिमात्य साहित्यविश्वात अनेकदा असं आढळून येत की काही साहित्यिकांनी एक किंवा दोन पुस्तकं लिहिली आणि तर जगप्रसिद्ध झाले परंतु ते जगप्रसिद्ध झाले म्हणून त्यांचं सारंच साहित्य ‘ग्रेट’ मानलं जात नाही परंतु चित्रकलेच्या बाबतीत असं होताना दिसत नाही! हा एक अनुत्तरीतच प्रश्न आहे. म्हणूनच अशा वेळी वरील उद्गार काढणारा पॉल गोंग हा चित्रकार जास्त भावतो.

dastan-khdir-udYVDaCpB7U-unsplash(1)

    कलेच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि पैसा मिळवणं आजच्या कलावंताची प्रायोरिटी होऊन बसलेले दिसतात ह्या सगळ्याला ती ती तत्सम करणे कारणीभूत असली तरीही आजच्या काळातील जो एक कलाविषयक दृष्टिकोन आपल्याला जाणवतो तो अशिष्य असह्य करून सोडतो. आज कलाक्षेत्रात “स्व” च्या ओळखीचा लोभ निर्माण झालेला आपल्याला दिसतो मात्र कलेसाठी लागणार चिंतन, सराव, रियाज, वाचन ह्यासाऱ्याचं महत्व दुर्लक्षित होताना दिसत.

वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे

पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे

रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो

आरशावरती आता, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे

इलाही जमादार ह्यची वरील गझल आजच्या मानवाच्या आयुष्यतील एकप्रकारची हतबलता दर्शवते. आणि कला ही कायमच मानवाच्या स्वभावरूपाचे चित्रण करणारी राहिली आहे.

    मी स्वतः एक रसिक आहे आणि हा रसिकपणा मला सर्व कलांच्या जवळ न्हेतो. माझ्याकडून होणारी कलानिर्मिती नक्कीच मला आनंद देत असते मात्र माझ्यातला रसिकपणा मला इतर कलांचा अधिक छान्गल्या प्रकारे आस्वाद घ्यायला शिकवतो. असं म्हणतात कि भारतीय भूमीवर जन्मलेल्या प्रत्येकालाच टीका-समीक्षा कारण्याचा अधिकार हा जन्मजात मिळालेला असतो मात्र मला असं वाटतं रसिकपणातून तयार होणार आपलं अनुभवविश्व हे अधिक प्रगल्भ असत आणि त्यामुळे कलात्मकनिर्मितीही आणखीनआणखीन प्रगल्भ होत जाते.

काही दिवसांपूर्वी एक वाक्य वाचनात आलं –

“कवी असणं ही अवस्था आहे व्यवसाय नाही.”

    मला असं वाटतं कलेच्या प्रत्येक प्रकारात हे झालं तर निर्मिती नक्कीच अभिजात होईल. मात्र हा अभिजाजतेचा स्पर्श आपण काळाच्या संधर्भात जेवढं मागे जातो तेवढा तो जास्त प्रमाणात जाणवतो.जेव्हा मी म्हणतो, कि आजकाल घृणास्पद गोष्टींना अतिमहत्व आलं आहे तेव्हा तुम्हाला वाटेल कि मी एकतर विनोद तरी करतो आहे किंवा साहित्य-कलेच्या स्तुतीसाठी उपरोधाचं साधन तरी वापरतो आहे. परंतु कोणतीही कलात्मक निर्मिती म्हणजे एक प्रवास असतो. अशाच एका निर्मितीचा किस्सा इथे आवर्जून सांगावासा वाटतो. मी दरवर्षी शाळेत “कोलाज” चित्रप्रदर्शन भरवतो. ह्या प्रदर्शनात विशेषतः ५वी ते १०वी च्या मुलांचे कोलाज असतात.९वी पर्यंत मनापासून कोजाल करणारी हि मुलं १०वी ला येताच ते थांबवतात त्यामागची कारणमीमांसा इथे करण्यात अर्थ नाही. परंतु हातात असलेली इतकी सुंदर कला एकाएकी थोपली जाऊ नये म्हणून मग मी ह्या १०वी च्या मुलांना शेवटचा पेपर झाला की भेटायला बोलावतो त्यांना ड्रॉईंग पेपर आणि कोरीव कागद देतो आणि सुट्टीत जमेल तस हवं ते कोलाज तयार करायला सांगतो.

बरीच मुलं आवडीने येतात, साहित्य घेऊन जातात मग मात्र मी त्याचा कधीच पाठपुरावा करत बसत नाही. अशीच एक विद्यार्थिनी सहा महिन्यांनी माझ्याकडे आली, कोलाज पूर्ण होत आलय म्हणाली आणि मग अनपेक्षितपणे ९वीत असणाऱ्या तिच्या बहिणीने मला एक पिशवी दिली, म्हणाली ताईने पूर्ण झालेलं कोलाज दाखवायला पाठवलं आहे.

    ते कोलाज पाहून मी काही क्षण स्तब्ध झालो. आणि थंड पडलो ते म्हणजे इतकी सुंदर कलाकृती निर्मण करून त्या मुलीने सहज अलिप्तपणे आपल्या बहिणीकडे ती पाठवून दिली. कौतुकाची अपेक्षा नाही कि बक्षिसाची आस नाही. निर्मितीनंतर इतकं अलिप्त राहता येत का? मी ते चित्र घेऊन वर्गात गेलो सगळ्यांना दाखवलं, सगळे एकाएकी थक्क झाले आणि काहीक्षणांनी भानावरून टाळ्या वाजवू लागले. हे कोणत्या ‘आर्टिस्ट’ च चित्र नव्हतं, भल्यामोठ्या आर्ट गॅलेरीच प्रदर्शन नव्हतं, पाहणारे कुणी आर्ट क्रिटिक नव्हते. पण कला म्हणजे आणखी दुसरं काय असतं, साऱ्यांना आनंद देणं!

    ‘श्रुतिका मंगेश शिंदे’ या मुलीचं हे कोलाज आहे. तिचा रोजचा शाळेचा प्रवास माझ्यासमोर उभा राहतो. येऊन-जाऊन चालत ८ कि.मी. माझ्या डोळ्यासमोर तिचे गावातले कौलारू घर आणि घराच्या पडवीत कोलाज करणारी ती असं चित्र उभं राहत. तीच चित्र जरी व्यान गॉग इतकं किंवा पिकासो, गायतोंडेंसारखं श्रेष्ठ कलात्मक वैगरे नसलं तरीही ती तिची निर्मिती होती अर्थात तिचा कलाविषयक दृष्टीकोन होता आणि आपल्याला ह्याच दृष्टीकोनातून आपल्याला ‘अभिजात’ कला निर्माण झालेल्या दिसतात.

    अच्युत गोडबोले ह्यांच्या “कॅनव्हास” ह्या पुस्तकातील ऑगस्ट रोंदे च्या शिक्षकाने त्यांना दिलेला सल्ला मला कलेच्याबाबतीत फार महत्वाचा वाटतो तो म्हणजे – चांगला शिल्पकार होण्यासाठी, चांगला चित्रकार तर असावाच लागतं पण त्याला सगळ्याच कलांची ओळख देखील असणं आवश्यक असत. एका चांगल्या शिल्पकाराला साहित्य, संस्कृती आणि वास्तुरचना यांचाही अभ्यास करावा लागतो. शिल्पकाराजवळ काळाला भेदून पुढे जाणारी दृष्टी असावी लागते. म्हणूनच इतिहास देखील त्या त्या काळातल्या शिल्पांच्या कहाण्या सांगतो.

    आणि हा सल्ला केवळ शिल्पकारासाठीच नसून सर्वच कलाकारांसाठी, कलांसाठी लागू पडतो. कलाविषयक दृष्टीकोन प्रगल्भ करण्यास मदत करतो.

    ‘आजच्या काळातील कलाविषयक दृष्टिकोन’ ह्या विषयात अधिकारवाणीने बोलण्याइतका मोठा कलाकार किंवा समीक्षक मी नाही. मी एक ग्रामीण भागात शिकवणारा कला शिक्षक आहे. आयुष्याची १५-१६ वर्ष ग्रामीण भागातील मुलांना ‘कला’ हा विषय शिकवत असताना जे जाणवलं त्या मुलांकडून जे शिकलो ते आज मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि ते मांडताना सगळ्यांना ओरडून सांगावस वाटत, फेम स्टाईल ह्यात न गुंतता, ह्यांपासून अलिप्त राहून प्रामाणिकपणे कलानिर्मिती करीत राहिलो तर नक्कीच कलेतील अभिजात मूल्ये आपल्या दृष्टीसपडून आपला कलाविषयक दृष्टिकोन प्रगल्भ होईल.

  • नितीन विजय गुरव (कलाशिक्षक)

ता. महाड – जि. रायगड

९४२३३७६३८८

taelynn-christopher-pfSNx3Z12K8-unsplash
IMG-20191005-WA0009
  • अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे “कथ्थक नृत्यालंकार” पदवी प्राप्त.
  • सन्माननीय नृत्यांगना डॉ. मंजिरी देव आणि सुप्रसिद्ध तबला गुरू पंडित मुकुंदराज देव ह्यांच्या शिष्या.
  • नृत्यक्षेत्रात ३० वर्षे कार्यरत.
  • प्रसारभारती दूरदर्शन तर्फ ‘अ’ श्रेणी कलाकार.
  • सूर-शृंगार संसदेतर्फे ‘शृंगारमणी’ पदवी प्राप्त.
  • ‘गिरनाररत्न पुरस्कार’, ‘योगेश्वरीरत्न पुरस्कार’, ‘मधुबनरत्न पुरस्कार’ आणि इतर मानाचे पुरस्कार प्राप्त.
  • ‘उंच माझा झोका गं’ (१९९७), या नाटकासाठी नाट्यदर्पण तर्फे “सर्वोत्कृष्ट अभिनेती” पुरस्कार प्राप्त.
  • कथ्थकगुरु नृत्यांगना रुपाली देसाई ह्या ‘संस्कृती नृत्यकला मंदिर’ या संस्थेच्या संस्थापिका आहेत तसेच गेली २३ वर्षे कथ्थक नृत्याचे अध्यापन करीत आहेत.

आजच्या काळातील कलाविषयक दृष्टिकोन

असं म्हणतात प्रत्येक व्यक्तीचा आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच त्याला घडवतो. मग तो सकारात्मक किंवा नकारात्मक असो एखाद्या गोष्टीची आवड अथवा नावड जाणणे म्हणजेच दृष्टिकाेन, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मी गेली तीस वर्षे कथ्थक नृत्य क्षेत्रात कार्यरत आहे. इतक्या वर्षांच्या माझ्या अनुभवातून आज मला आधीच्या आणि आत्ताच्या काळातील कलाविषयक दृष्टिकोनात जो अनुभव मिळाला तो मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

कला म्हणजे आनंद. तो आनंद घेताना त्याला शास्त्राची जोड मिळाली की अर्थातच त्या कलेच्या सादरीकरणात एक सुंदरता, निश्चितता, प्रगल्भता पाहायला मिळते. ती शिकताना किंवा प्रस्तुत करताना मिळणारा आनंद हा कुठल्याही शब्दात किंवा कुठल्याही मूल्यात मोजता येत नाही. त्या सुंदर अनुभूतीच्या पुनःप्रत्ययातून ती कला बहरलेली पाहायला मिळते. कुठलीही कला शिकताना शिकवताना त्यामधून जीवनात सकारात्मक दृष्टिकोन अनुभवता येतो. आपण जे नेहमी करतो त्यापेक्षा काहीतरी वेगळे शिकले किंवा केले, तर मन प्रसन्न राहते. शरीरातील थकवा दूर होऊन अधिक उत्साह जाणवतो. हे आता वैद्यकानुसारदेखील सिद्ध झाले आहे. विविध कला शिकण्यातून जीवनात एक नवीन उमेद तयार होते. कला खूप मेहनतीने आत्मसात करावी लागते. खूप वर्षे साधना करावी लागते. कला आपल्यातील अहंभाव काढून  टाकते. कलेमध्ये सकारात्मकता असल्याने मानसिक संतुलन बिघडत नाही, डिप्रेशन येत नाही. कठीण गोष्टींना सामोरे जावे लागले तरी त्यातून तितक्याच निर्भयतेने ती व्यक्ती पुन्हा पूर्ण ताकतीने उभी राहू शकते. कला शिकणाऱ्या व्यक्तींना मानसिक वृद्धत्व कधीच दिसत नाही आणि म्हणूनच की काय आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सगळ्यांचा कला शिकण्याकडे कल अधिक दिसून येतो.

उत्तम कलाकार घडणे त्या कलेमध्ये पारंगत होणे,  त्या कलेमध्ये प्रसिद्धी मिळणे या खूप वेगळ्या गोष्टी आहेत, परंतु आत्ताच्या काळात पालक आणि विद्यार्थी या गोष्टींची गफलत करताना दिसतात.

गुरू, श्रद्धा ,सबुरी, रियाज़ आणि सातत्य या सर्व गोष्टींना प्राधान्य दिल्यानंतरच एखादा विद्यार्थी उत्तम कलाकार म्हणून घडतो.

कोणत्याही कामात प्रामाणिकपणा आणि कष्ट असल्याशिवाय ते काम यशस्वी होत नाही, तसेच कोणत्याच अवघड कामाला किंवा साधनेला “शॉर्टकट” नसतो हे सर्वांनीच जाणून घेतलं पाहिजे. कोणतीही कला ही ऑनलाईन बघून शिकता येत नाही. कला ही साधना आणि रियाजाने साध्य होते. मग ती कुठलीही असो. कुठल्याही कलेची तोंडओळख थोड्या दिवसात आपणास होऊ शकते, परंतु त्यातून कलाकार घडवायचा असेल  तर त्यासाठी अनिश्चित काळ जावा लागताे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा कोणाचीही नक्कल करून येत नाही. त्यासाठी आपलं स्वतःचं योगदान असावं लागतं.

कलाकार घडणे ही खूप मोठी प्रक्रिया आहे.

मला वाटतं प्रत्येकाने सर्वप्रथम कलाही आनंदासाठी शिकायला हवी. त्यात आनंद मिळतोय असं वाटताच आपसूकच ती व्यक्ती ती कला अधिक लक्ष देऊन आत्मसात करण्याचा प्रयत्न करते आणि मग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रियाज ही मोठी वाट तिला दिसायला लागते, जी कधीही न संपणारी असते.

हल्ली माध्यमांमुळे नको एवढा पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रसिद्धीचा मोह पडत आहे. कमी वेळात जास्तीत जास्त प्रसिद्धी हा फंडा पुढे आल्यामुळे कलेकडे सर्वांचाच बघण्याचा दृष्टिकोन थोडासा “कॅज्युअल” झालाय असं मला वाटतं. आताच्या काळात कला शिकताना मुळातच तेवढा विचार केला जात नाही. सध्या आपल्या पाल्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या प्रयत्नात त्यांना कलेसारखी गोष्ट नीट शिकवली जात नाही. खेदाची गोष्ट एकच वाटते उत्तमोत्तम कलाकारांची कला आपल्या पाल्याने बघावी हा दृष्टिकोनच सगळीकडे संपत चाललेला आहे. केवळ आपल्या पाल्याची पदवी किंवा लवकरात लवकर मंचावर पदार्पण कसे करता येईल याकडेच भर दिला जात आहे.

कलेची साधना ही मर्यादित नसते. कुठलाही गुरू हा सतत विद्यार्थिदशेतच असतो. समुद्रामध्ये जसे अनेक मोती आहेत तसेच दररोज अभ्यास केल्याने, रियाज केल्याने त्याला त्याच्या कलेमध्ये अधिक मोती सापडत असतात. कुठल्याही कलेमध्ये संपूर्ण पारंगत कोणी होऊ शकत नाही, पण तरी अधिक समृद्ध नक्कीच होतो. इतक्या वर्षांचा अनुभवात  कला शिकताना मला ज्या गोष्टी जाणवल्या त्या  थोडक्यात मांडते.

सर्वप्रथम सुयोग्य गुरू मिळणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.

योग्य अशा गुरूची निवड केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला त्या गुरूवर संपूर्ण विश्वास ठेवावा लागतो. कलेमध्ये प्रसिद्धी मिळणे ही खरं म्हणजे खूप नंतरची पायरी आहे. प्राथमिक आवश्यकता म्हणजे ती आनंदाने शिकणे, त्याचे निर्दोष सादरीकरण करणे, आपलं कायचुकत आहे हे कळणे, बरोबर काय आहे ते कळणे, जे बरोबर आहे ते कसे आत्मसात करायचे ते कळणे आणि

मग त्यासाठी योग्य रियाज करणे. यापैकी एखाद्या जरी गोष्टीचा अभाव असेल, तर कलेत प्रगती होत नाही .चुका सुधारल्या पाहिजेत, विचारांची अनुभूती झाली की मग रियाजाची आवश्यकता आपोआपच जाणवते. थोडक्यात रियाज या संकल्पनेचा अर्थ किंवा व्याख्या मला जाणवली ती अशीजे येत नाही पण यायला पाहिजे ते येण्यासाठी करायची मेहनत किंवा कष्ट किंवा साधना किंवा तपस्या.

येथे गुरू संकल्पनेची आवश्यकता अधोरेखित होते किंवा महत्त्वाची ठरते. सुयोग्य गुरू मिळणे ही जशी भाग्याची गोष्ट आहे, योगाची गोष्ट आहे तशीच त्या गुरूकडून त्या जाणकार व्यक्तीकडून समक्ष मार्गदर्शन मिळणे ही आहे. गुरूकडून तयार मार्गदर्शन मिळते, पण अशा गुरूची प्राप्ती कोणत्याही कारणाने नाही झाली, तर मात्र स्वतः मार्ग शोधावा लागतो. यात कष्टही असतात आणि त्यासाठी काळसुद्धा जास्त लागू शकतो. सर्वांनाच हे शक्य होते असे नाही.

रियाज किती करायचा यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो कशाचा आणि कशा रीतीने करायचा. जी गोष्ट येते ती तीच करत राहिली, तर येत असलेली गोष्ट झळाळून उठेल, पण जी गोष्ट येत नाही ती तशीच राहील.

प्रत्यक्ष कला सादरीकरण हा रियाज आहेच, पण त्याबरोबरच श्रवण, वाचन, मनन, चिंतन, वादन हेसुद्धा रियाजाचे महत्त्वपूर्ण प्रकार आहेत.  कोणत्याही प्रकारच्या कलेमध्ये गुण किंवा दोष असू शकतात, पण त्यातील दोषनिवारण करणे, यानंतर कलेमध्ये प्रगती करणे महत्त्वाचे. असे केले तरच ती चांगली तयार करण्यासाठी योग्य प्रयत्नांची आवश्यकता भासते. ती आवश्यकता म्हणजेच रियाज़.

म्हणजेच रियाज़ स्वतःसाठी असतो. चालून आलेल्या पायवाटेचा तो शोध असतो. शोध एका क्षणात लागत नाही. अनेक प्रसंगांपैकी एखादा सिद्ध होतो. तो सिद्ध होणारा क्षण सापडेपर्यंत आपण त्या शोधाच्या सान्निध्यात असतो. त्या झपाटणाऱ्या वेडाचा सहवास हेच संगीत. गानसम्राज्ञी डॉ. प्रभा अत्रे अस म्हणतात, “रियाज म्हणजे नामस्मरण. कार्यक्रम म्हणजे आरती. कार्यक्रमाला बरेच जण येतात. त्यांची उद्देश्यं ही वेगळी असतात. आरतीमध्ये देहभान हरपणारे  फार थोडे. आरती म्हणताना प्रत्येकजण हरपून जातो असं नाही. नामस्मरण केवळ स्वतःसाठी असतं. नामजप करणारे आपणच आणि ऐकणार ही आपण. आपणच स्वतःवर खूष व्हायचं. आपणच स्वतःवर नाराज व्हायचं. खुश होण्याचे क्षण खूप कमी असतात. कारण स्वतःला प्रसन्न करणं हे कलाकारासाठी फार अवघड असतं. प्रत्येक वेळी तुमच्यापेक्षा उंच शिखर तुम्हाला खुणावत असते. काही वेळा कितीही उत्तम सादरीकरण केले, तरी रसिकांना काही जागा  हेरता आल्या नाहीत म्हणूनसुद्धा शल्य मागे उरतं.”

तरीही एक निश्चित म्हणावंसं वाटेल भारतीय संस्कृतीला परंपरेला अजूनही आजच्या काळात तितकंच महत्त्व आहे. ते जोपासण्याचा जर प्रत्येकाने डोळसपणे प्रयत्न केला तर कलेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन अधिक सुदृढ होईल.

 

– कथ्थकगुरू नृत्यांगना रूपाली श्रीकांत देसाई

( संस्कृती नृत्य कला मंदिर )

 

***

पुष्कळांचे जग

लहानपणी गावी रहाटगाडगे पाहिले होते. एक बैल त्याला जोडलेला असे. तो गोलाकार फिरत राही. विहिरीतून भांड्यांची साखळी खाली वर येत राही. भरलेली भांडी रिकामी होत. पुन्हा खाली जाऊन भरली जात. असे चक्र सुरू असे. पुढे यामागचं एक महत्त्वाचं तत्त्व लक्षात आलं. बैलाची शक्ती, त्याला नियंत्रित करणाऱ्या माणसाची शक्ती, गाडग्यांमध्ये पाणी भरण्याची क्षमता या साऱ्यांची एक मर्यादा असे आणि त्या मर्यादेतंच विहिरीतील पाण्याचा उपसा होऊन ते वापरले जात असते. ह्यात पाणी वाया जाण्याची शक्यता कमी होती. यामुळे नैसर्गिकरीत्या आवश्यक तितकेच पाणी वापरले जात असे. पुढे रहाटगाडगे गेले आणि विजेवर चालणारे मोटरपंप आले. मानवी कष्ट कमी झाले. प्राण्यांचा सहभाग नाहीसा झाला. एक बटण दाबले की पाण्याचा लोट सुरू होऊ लागला. पाण्याच्या वापरावर निर्बंधच नाही. वाहणारे पाणी आवश्यक आहे का? आपल्याला खरोखर तितक्या पाण्याची गरज आहे का ह्याचा विचार राहिला नाही आणि ह्यामुळे पाण्याचे एक साधन म्हणून मूल्यही कमी झाले. माहिती तंत्रज्ञान,

संगणक, मोबाईल, इंटरनेटचा होत असलेला वापर आणि त्यामुळे एका क्लिकने हाताशी सहजपणे उपलब्ध झालेली साधने, या साऱ्यांचा परिणाम त्या धो-धो वाहणाऱ्या पाण्यासारखा झाला आहे असे मला वाटते. कलेच्या संदर्भात साधनांच्या या सहज उपलब्धतेमुळे नक्की काय झाले आहे याचा विचार करण्यासाठी हा लेखनप्रपंच.संगणक, मोबाईल, इंटरनेटचा होत असलेला वापर आणि त्यामुळे एका क्लिकने हाताशी सहजपणे उपलब्ध झालेली साधने, या साऱ्यांचा परिणाम त्या धो-धो वाहणाऱ्या पाण्यासारखा झाला आहे असे मला वाटते. कलेच्या संदर्भात साधनांच्या या सहज उपलब्धतेमुळे नक्की काय झाले आहे याचा विचार करण्यासाठी हा लेखनप्रपंच.पूर्वी फोटोग्राफी ही एक चैन होती. लोक अगदी सणासुदीला जत्रेमध्ये, काही खास प्रसंगीच फोटो काढत. लग्नात फोटोग्राफीच असे. तीही श्रीमंतांनाच परवडत असेल. व्हिडियो शूटिंग नंतर सुरू झालं. फोटोंना एक वेगळं महत्त्व होतं. त्यात एक दुर्मिळपणा होता. ते जुने कृष्णधवल फोटो माणसं जिवापाड जपत. ते पिवळे पडू लागल्यावर तर त्याला वेगळेच मूल्य चढत असे. छायाचित्रण एक कला म्हणून तरी कसे होते? आधीच ते फिल्मवर होत असे. फोटो काढल्यावर ते डार्करूममध्ये जाऊन त्यावर काही प्रक्रिया होणार. मग अगदी शेवटी कळणार की फोटो चांगला आला आहे की वाईट. वाईट आला असेल तर ते सारे क्षण वाया गेले. पुन्हा ते दिवस आणि ते क्षण येणे नाही. त्यामुळे फार काळजी बाळगावी लागत असे. निरनिराळ्या प्रकारच्या फिल्म्स उपलब्ध होत्या. कॅमेरे फक्त व्यावसायिकांनाच परवडत होते. हौस किंवा छंद म्हणून कॅमेरा घेणे हे तर अगदीच दुर्मीळ. आता परिस्थिती बदलली. मोबाईलमुळे अगदी शेंबडं पोरदेखील फोटो काढू लागलं. आताच्या पिढीला फोटोचं महत्त्व किती वाटतं? काढलेल्या फोटोचं आयुष्य किती असतं? इन्स्टाग्रामवर फार तर काही तास. त्यानंतर मंडळी सर्व विसरतात आणि पुढच्या क्षणाचे फोटो काढू लागतात. जणू काही फोटो काढण्याचा एक कंपल्सिव्ह असा व्यसनासारखा मनोविकारच पसरला आहे.

तो कॅमेरा, शटर स्पीड, ते अ‍ॅपर्चरचे अ‍ॅडजस्ट करणे, तो खरोखरचा त्या मशीनचा “क्लिक” असा आवाज, ते एखाद्या बालकाच्या जन्मासारखे डार्करूममध्ये जाऊन फोटोचे केलेले बाळंतपण, फोटो मिळविण्यासाठी फोटोग्राफरच्या दुकानात जायचं, मग तेथून सुंदर फ्रेम निवडायची, त्यात तो फोटो बसवायचा आणि तो घरी आणून कुठे लावता येईल ह्यावर चर्चा करायची. कारण तो लावल्यावर तेथे अनेक वर्षे राहणार आहे ह्याची खात्री असायची. हे सारं काही मोबाईल फोटोग्राफीमुळे नाहीसंच झालं. पण ह्याहीपेक्षा वेदनादायक आहे ते छायाचित्रणाचे एक कला म्हणून जवळपास संपलेले मूल्य. ही एक प्रतिभेचं मागणं करणारी कला आहे असं आता किती जणांना वाटत असेल?

ज्याला समोरच्या दृश्यात उत्तम फोटोसाठी आवश्यक असलेली “फ्रेम” दिसत नाही तो फोटोग्राफर होऊच शकत नाही. पण आता ह्याची गरजच काय? जवळ महागडा मोबाईल असला की सारे काही सोपे झाले आहे. शंभर अँगलनी दहा मिनिटात शंभर फोटो काढायचे, एक तरी चांगला निघेलच. शिवाय त्यात फोटो लाईट, डार्क करणारी साधनं असतातच. त्यामुळे त्याचीही काळजी नाही. निरनिराळे मोड्स असतात. त्यावर कॅमेरा सेट केला की आपले काम फक्त बटण दाबण्याचे. त्यामुळे सगळेच फोटोग्राफर्स झाले आहेत.

alexander-andrews-soLEw77Napo-unsplash

साधनांच्या पुष्कळ उपलब्धतेमुळे जुन्या दुर्मीळ कला या “पुष्कळा” झाल्या आहेत. अनेकांना वाटत असेल साधनांच्या सहज उपलब्धतेमुळे कलेच्या प्रांतातली प्रस्थापितांची मक्तेदारी संपली. मला तसं वाटत नाही. उलट साधने अफाट प्रमाणात सहज उपलब्ध झाल्यामुळे कलेचा दर्जा खालावला आणि एकंदरीतच त्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन “कॅज्युअल” झाला असे मात्र मला वाटते. कलेकडे आणि कलाकारांकडे पाहण्याची दृष्टीही बदलली. अनेकदा “ह्यात काय विशेष? हे मीदेखील करू शकतो” अशी भावना आली. काहीही खायला बसले की त्याचा निरनिराळ्या अँगलमधून आधी फोटो काढायचा आणि इन्स्टाग्रामवर टाकायचा हे तुम्ही काही महिने सातत्याने केलंत की तुम्ही फोटोग्राफर होऊनच जाता. मग फुले दिसली की फोटो काढायचे, भिकारी दिसला की फोटो काढायचे, कचराकुंडीचे फोटो काढायचे त्यामागे काही सांगण्यासारखं आहे का ह्याचा विचार करण्याची गरजच नाही. कारण फोटो क्लिक करण्याचं साधन हाताशी आहे. तो क्लिक केल्यावर कुठेतरी अपलोड करता येतो. त्यावर काही मिनिटात शंभर लाईक्स मिळतात. पाच मिनिटांची ती झिंग पुरेशी असते. एखादा तंबाखूचा बार तोंडात भरावा आणि नशा वाटावी त्याप्रमाणे. नशा उतरली की पुन्हा नवीन फोटोसाठी चड्डीच्या खिशात मावणारा कॅमेरा आहेच.

जुने ते सोने पण नेवे तेही हवे

Change is the only constant.

हे वाक्य कितीही उपरोधिक वाटलं तरी त्यात तथ्य आहे. इतिहासाचा आढावा घेतला तर लक्षात येतं की कुठलंही क्षेत्र बदलावाचून राहिलं नाही. वैज्ञानिक शाखांपासून अगदी सामाजिक संरचनेपर्यंत प्रत्येक गोष्टीत वेगवेगळ्या प्रमाणात आणि वेगाने बदल घडले आहेत. पण या नाण्यालादेखील दुसरी बाजू आहे – अडून राहण्याची प्रवृत्ती. आपला समाज कितीही पुरोगामी आहे असं म्हटलं तरीही स्वतःच्या पोटचं मूल जेव्हा समलैंगिक नातं जोडू पाहतं तेव्हा या बदलाची व्याख्या धूसर होऊ लागते.

या बदलाने जेव्हा कलाक्षेत्राचं दार ठोठावलं आणि आपण त्याचं स्वागत केलं तेव्हा आपण त्याला या प्रवृत्तींसोबत खोली शेअर करायला सांगितली. तसा बदल खूप समजूतदार घरातला असल्याप्रमाणे वागतो, पण खोली शेअर करायला लागल्याचं दुःख अधूनमधून डोकावतं. Passive Aggressive पद्धतीने म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

आजचा कलाविषयक दृष्टिकोन याच बाचाबाचीमध्ये काही प्रमाणात वावरतो असं मला वाटतं. बदलाचे वारे हवेहवेसे वाटतात पण काही केल्या “आम्ही बुवा असं करायचो” असं वाक्य ऐकवल्यावाचून संपत नाही. आता यात पिढ्यांमधल्या वादामुळे आणखी ठिणग्याही उडत असतील, कुणास ठाऊक? पण एवढं मात्र मला एक जाणवतं – आजचा कलाविषयक दृष्टिकोन हा “जुने तेच सोने” आणि “बदल ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे” या दोघांमध्ये सोयीस्करपणे झुलतो.

नियम मोडण्यासाठीच असतात हे धोरण बावळटांनाच सुचतं हे खरं आहेच. पूर्वजांनी ताकीद देण्यास्वरूपात घालून दिलेले नियम कसे काय मोडता या नैतिकतेच्या वादात मी पडतंच नाही, पण नियम मोडून पाहून नेमकं काय करावं आणि करू नये हे स्वतःहून अनुभवण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असावं, तर कलाकाराला का नाही? शक्यतो नियम मोडू नयेत, पण म्हणून प्रत्येक नियम Timeless होत नाही!

गायन व नृत्यात एक ठरावीत आराखडा चौकटीत बांधण्यासाठी नसून आधार घ्यायला असतो. कुठल्या सिनेमाचा remake किंवा पुनरुज्जीवित नाटक एक नवं Interpretation पुढे आणायला केलं असतं. “प्रयत्न उत्तम होता पण अमुकांची मज्जा औरच” अशा वेळी आलेलं हे वाक्य नव्या कलाकारांना परकं नव्हे!

आधीच्या गायकांनी गायलेले राग, वठवल्या भूमिका थोर आहेतच. त्यांनी आत्ताच्या पिढीसाठी इतकी समृद्ध कलासंस्कृती दिली याचे आपण ऋणी असायलाच हवे. पण फक्त त्यालाच जवळ करून बदलाचे वारे नावापुरते स्वीकारणे हे साधारणपणे मला आजच्या दृष्टिकोनात जाणवलं.

आपल्या आईबाबांच्या हाताचा, घराच्या भिंतीचा आधार घेऊन, स्वतः चालायला शिकतो. तसाच या आपल्या पालकरूपी थोर कलावंतांनी दिलेल्या वडिलोपार्जित कलासंस्कृतीचा आधार घेऊन आत्ताच्या कलाकारांनी या संपत्तीत भर टाकून येणाऱ्या कलाकारांच्या पिढीला काहीतरी दिलं पाहिजे. त्यांनी आधार घ्यावा, “जुनं ते सोनं” म्हणावं यासाठी आत्ताच्या कलाकारांनी त्यांच्यासाठी “जुनं” निर्माण करायला हवं.

जेव्हा या जुन्या पिढीच्या संपत्तीची नव्या पिढीच्या बदलांशी छान गट्टी जमेल तेव्हा कलेच्या घरी मालक झालेली प्रवृत्ती आपल्या घरी मुकाट्याने निघून जाईल.

“ही जणू प्रति आशा खाडिलकर”

“हा जणू प्रति पुलंच”

अशा वाक्यापेक्षा “तुझ्यामुळे अमुक तमुक ची आठवण आली” असं म्हणून पहा.

वाक्यातला फरक थोडासाच आहे.

परंतु त्याने साधलेला फरक मोठा असू शकतो.

– रोहित फाळके

आत्मपरीक्षण

प्रत्येक माणसाला काही निसर्गदत्त देणग्या असतात. बोलणं, हसणं, चालणं, वगैरे. तशा आणखी काही गोष्टी असतात. गाणारा कंठ, सूर कळणारा कान, थिरकणारे पाय, काव्य सुचणारं डोकं, रंग भरणारे हात, असे प्रतिभाशक्तीचे अनेक आविष्कार असतात. ह्या देणग्या असतात, याविषयी अनेक लोक अनभिज्ञ असतात. पण जेव्हा त्या कळतात तेव्हा खरा साक्षात्कार होतो.

ह्या साक्षात्कार ठराविक परिस्थिती अनुकूल झाली की आपोआप होतो. कारण जन्मजात प्रत्येकाचा कुठेतरी ‘कल’ असतो. आपल्यातला ‘कल’ एकदा जाणवला ना, की ‘कला’ शोधायला वेळ लागत नाही. माझ्या मते गायन, वादन, नृत्य, साहित्य, अभिनय वगैरे कला पडताळून पहाव्यात. जिचा अभ्यास केल्यावर मन रमते, जिच्या फक्त चिंतनाने अंगावर शहारे येतात, तेव्हा जाणावे, साक्षात्कार झाला आहे. ही कला आपली! मग पहा कसं जीवन समृद्ध होतं!

आजकाल सगळं त्वरित हवं लोकांना! फास्ट फूड, फास्ट रेलशनशीप, झटपट प्रसिद्धी, पटकन नफा, पटकन पैसे, पटकन नोकरी, पटकन बंगला, सगळं काही पटकन. मग मृत्यू सुद्धा पटकन! या पटकन, झटपटच्या नादी लागून त्या साक्षात्काराला लोक मुकत आहेत. आज एक गाणं शिकलं, उद्या सोशल मिडिया वर टाकलं, परवा चित्रपट, नंतर ऑस्कर, मग बंगला आणि ही लिस्ट संपत नाही. कोणालाही तो साक्षात्कार नकोय. कोणालाही तो आनंद नकोय.  कलेप्रती लागणारी भक्ती, मेहनत नकोय. हवाय तो फक्त मोबदला.

कलेचं स्थान दुय्यम कधीच नव्हतं. सामवेदात गायनकलेविषयी सुंदर विवेचन आहे. श्रीकृष्ण सुद्धा बासरी वाजवत होताच की! आपल्या भारत देशात खूप आपुलकी मिळते कलाकारांना! जर तो कलाकार असेल तर. पण अर्धे लोक हे कलाकार नसतात तर नकलाकार असतात. “आमची शालू बरं का, डिट्टो लतादीदींसारखी गाते.” “आमचा जित्या आहे की नाही, तो तर काय डिट्टो आवाज काढतो सुधीर फडकेंचा!” हे जो पर्यंत चालू आहे तो पर्यंत खरं, नवं कसं येणार? आदर्श असावेत, पण नकला करु नये. स्वत:चं काय म्हणणं आहे ते मांडल्याशिवाय कलावंत घडत नसतो. हे सारं कळलं पाहिजे.

कलेविषयी एक आंतरिक ओढ लागायला हवी. अस्वस्थता वाटायला हवी. तरंच काहीतरी अभिजात घडू शकतं. क्लासला जाऊन ती ओढ निर्माण होत नाही. ती आपणच शोधावी लागते. मीचि मज व्यालो| पोटा आपुलिया आलो|| आज खरी गरज या आत्मपरीक्षणाची आहे.

स्वत:च स्वत:चा मार्ग शोधावा आणि तो सहसा मिळतो. एकदा मिळाला की मग ‘चला वही देस’!

 

– चिन्मय वालावलकर

कला

मानवाच्या जीवनात कलेला खूप महत्त्वाचं स्थान आहे. संस्कृत भाषेत कला ह्या शब्दाला विभिन्न अर्थांनी प्रयुक्त केले आहे. जसं की एखाद्या वस्तूची खोली, खंड, अालंकरण, कुशलता इत्यादी. कलेचं तात्पर्य सौंदर्य, सुंदरता आणि आनंद ह्यांच्याशी तर आहेच, परंतु त्याचबरोबर आपलं मनोगत गोचर स्वरूपात व्यक्त करणं म्हणजे कला होय. त्यातही मराठी साहित्याला अनंत काळाचा वारसा लाभला आहे. मराठी साहित्याची मूळ ओळख ही इतिहासात घडून आलेल्या विविध घटनांमधून होत आली आहे. त्या काळातील ललित काव्य किंवा लेख, महाकाव्ये, कादंबरी, कथासाहित्य, गझला, ओव्या,  आरत्या, भारुड, अभंग, कीर्तन, पोवाडा, लावणी, बखर, लोकगीत, गोंधळ, अग्रलेख, नाटकं, लोकसाहित्य, बालसाहित्य, उखाणे, कविता, चारोळ्या, पोथ्या हे सगळंच प्राचीन मराठी साहित्याचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यानंतर समाजात चांगल्या साहित्याची निर्मिती दोन प्रकारे होऊ लागली. अभंग, भारुड, ओव्या ह्यासारखे प्रकार स्त्रिया फावल्या वेळेत रचत आणि त्यामार्फत एखाद्या घटनेचा किंवा गोष्टीचा उल्लेख करत ही साहित्य सगळ्यांपर्यंत पोहोचवत. तर दुसरीकडे ललित साहित्य प्रकार रचून लिहून ठेवून त्यामार्फत पुढच्या पिढीला साहित्याचं ज्ञान दिले जायचे.

मराठीतलं बरंच साहित्य हे मातीतून उगम पावलं आहे. माणसाचं किंवा मानवी जीवनाचं रूपक म्हणून झाडांचा साहित्यात उपयोग कायमच होत आला आहे, पण याचं मूळ काय? उत्क्रांतीच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर झाडालाही आपल्यासारखा जीव आहे, कदाचित भावनाही आहेत हे आपल्याला समजलं असावं? आदिमानवाला जेव्हा आपल्यासारख्याच वाढणार्‍या, खुरटणार्‍या, बहरणार्‍या आणि उन्मळून पडणार्‍या झाडाबद्दल प्रथम आत्मीयता वाटली असावी. ही झाडं तर आपल्यासारखीच असं वाटून जिवाचे मैत्र जडले. तो क्षण मा निषादच्याच तोडीचा असावा आणि कदाचित सुसंस्कृत होण्याचा पहिला टप्पाही. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला जिव्हाळा वाटतो, तिला आपल्या गोटात ओढण्याचा आपण जाणता-अजाणता प्रयत्न करत असतोच, त्यातलाच झाडांचे रूपक, हा एक भाग असावा असं मला वाटतं. (ममता हा शब्दच मुळात मम-ता म्हणजे माझेपणा यातून आला आहे. आत्मीयता, आपलेपणा यांचे शब्दशः अर्थही तसेच.) एखाद्या जिवलग मित्राला भावासारखा म्हणून अधिक आतल्या वर्तुळात आपण ओढत असतो, त्यातला प्रकार. तेव्हा झाडांवर होणारं हे मानवी भावभावनांचं रोपण वृक्षवल्ली आम्हां सोयरी याच भावनेतून उगवलं असावं. ‘जो खांडावया घाव घाली, की लावणी जयाने केली, दोघां एकची साऊली, वृक्षु जैसा म्हणत स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगणारे आणि काव्य म्हणजे काय, विचारल्यावर जिच्याकडे बोट दाखवावं अशा कोंभाची लवलव, सांगे मातीचे मार्दव सारख्या ओळी लिहून गेलेले ज्ञानेश्वर; वृक्षवल्लींना सोयरी म्हणणारे तुकाराम आणि कांदा, मुळा, भाजीत विठाई पाहणारा सावतामाळी; पाण्यात पाय सोडून बसलेला बालकवींचा औंदुबर; नितळ न्याहारीला काळा वायू घेणारी मर्ढेकरांची झाडं; गीतरामायण लिहिताना झालेल्या उन्मनीय अवस्थेचे वर्णन चंद्रभारल्या जिवाला नाही कशाचीच चाड; मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड अशा शब्दांत करणारे गदिमा; ‘प्रत्येक झाडामाडा त्याची त्याची रूपकळा, प्रत्येक पानाफुला त्याचा त्याचा तोंडवळा म्हणत प्रत्येक माणसातलं वेगळेपण शोधणारे, पावसाळ्यात वेली ऋतुमती झाल्या गं असं लिहून जाणारे बोरकर; तमाच्या तळाशी दिवे लागल्याचा अपूर्व अनुभव रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले; तिथे मोकळा मी मला हुंगिताना, उरी गंध कल्लोळुनि फाकले अशा शब्दांत मांडणारे शंकर रामाणी, निष्पर्ण तरूंच्या राईत झाडांत पुन्हा उगवायाची आस लागलेले ग्रेस; ‘आणिक तुझिया लाख स्मृतींचे, खेळवीत पदरात काजवे; उभे राहुनी असे अधांतरी, तुजला ध्यावे, तुजला ध्यावे अशी रक्तामध्ये ओढ मातीची लागलेल्या इंदिराबाई संत; युगानुयुगीच्या चिरतंद्रीत कृष्णाची प्रतीक्षा करणार्‍या राधेला जलवाहिनी निश्चल कृष्ण, वन झुकले काठी राधा, विप्रश्न म्हणणारे पु. शि. रेगे, ‘ग्रासली झाडे दिशांनी नग्नदेही, कोरड्या डोळ्यांत आता थेंब नाही असं लिहून जाणारे महानोर, ‘रांडेपेक्षा आहे रांड, मुलापेक्षां आहे मूल असे रोखठोक वर्णन करणार्‍या विंदांचे उगाचफूल, काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग लिहिणारे दासू वैद्य; ‘नेमस्त झाड मी आहे, मूळ फांद्या जिथल्या तिथे म्हणणारा संदीप खरे; गद्यातले उदाहरण द्यायचे झाले तर अंतू बर्व्याच्या दारातला गेली चाळीस वर्षं न मोहरलेला हापूस, ‘कोसलामध्ये वेताळाच्या टेकडीवरचं झाड पाहून – ‘खरं झाड म्हणजे जमिनीत असतं. वरचं झाड म्हणजे आतडी, फुफ्फुसं असं. माणसाचं जमिनीत काय आहे?’ असे आणि तत्सम प्रश्न पडणारा पांडुरंग सांगवीकर किवा बर्ट्रांड रसेलला गर्भश्रीमंतीचे झाड म्हणणार्‍या पद्मजा फाटक; चौकट राजातलं बोन्सायच्या झाडाचं उघड रूपक आणि जवळचा भाग असूनही गूढ, अज्ञात राहिलेल्या देवराईचं तरल प्रतीक; शाकुंतलातील आद्ये वः कुसुमप्रसूतिसमये यस्या भवत्युत्सवः अशा शकुंतलेच्या वर्णनापासून ते रुदालीत गुलजारच्या तेरा छूंआ लागे, मेरी सूखी डाल हरियाए पर्यंत अक्षरशः एक प्रबंध लिहिता येईल इतकी उदाहरणं सापडतील.

पेचात पडतो | प्रश्नात बुडतो |

जीव का कुढतो | वारंवार ||

अशी का विरक्त?’ | व्हावे मी उन्मुक्त |

जीव ज्यात आसक्त | ते शोधावे ||

सध्या बरेचदा होतं असं की माणूस लिहायला बसला आणि जेमतेम चार ओळी लिहून वा! वा! अशी दाद मिळवली की तो स्वतःला लेखक संबोधू लागतो. आपण वेगळं काहीतरी लिहायचं म्हणून वेगवेगळ्या संकल्पनांच्या शोधात असतो, पण काल्पनिक काही तयार करण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या खूप साऱ्या घटना एखाद वेळेस लिखाणाला प्रेरित करतात.  ते लिहितानादेखील लेखकाला सामाजिक गोष्टींचं ज्ञान असणं गरजेचं आहेच ह्याचा युवा लेखकांना खूपदा विसर पडतो. हे वेळीच लक्षात यावं ह्यासाठी वाचन आणि सततचं लिखाण ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. काही फायदा होतो म्हणून वाचन करू नये, हे जरी खरं असलं तरी त्यातून वेगवेगळे अनुभव आपण लेखकाच्या दृष्टीतून घेऊ शकतो. नाही तर एका आयुष्यात असे घेऊन घेऊन अनुभव तरी किती घेणार? बसल्याजागी वेगवेगळे अनुभव – व्हिकॅरियसली म्हणजे दुसऱ्याच्या उसन्या दृष्टीतून का होईना, आपण पुस्तकाच्या वाचनातून घेऊ शकतो. ‘का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रु प्रकटिता, असं कमलिनीबद्दल ज्ञानेश्वरीत म्हटलंय तसंच काहीसं. अर्थात कुणाला कुठला अनुभव, कुठला विचार आवडेल हे सांगणं अवघड. त्या त्या व्यक्तीच्या पिंडावरती ते अवलंबून. कोसला काय किंवा द फाऊंटनहेड काय. केवळ ती पुस्तकं ग्रेट आहेत ह्यापेक्षा तुम्हांला ती किती आवडतात हे महत्त्वाचं. केवळ गाजलेलं पुस्तक आहे म्हणून ते न आवडताच डोक्यावर घेऊ नये (उदा. शतकात सर्वश्रेष्ठ गणली गेलेली युलिसीस) किंवा जे बहुसंख्यांना आवडतं त्याला केवळ त्याच कारणाने हट्टाने नावं ठेवण्याचा अट्टाहासही करु नये. कविता आणि त्यांचा अर्थ, त्या आवडणं म्हणजे अजून एक पुढची पायरी. ग्रेसच्या सगळ्याच कविता कुठे कळतात? त्यांच्या ओळी हा एक वैयक्तिक अनुभव असतो. प्रत्येकाच्या मनात ती कविता वाचून तयार होणाऱ्या स्पष्ट – अस्पष्ट प्रतिमा वेगवेगळ्या, ज्याच्या-त्याच्या पिंडावर आणि आजवर घेतलेल्या अनुभवांवर बेतलेल्या. दहा हजार कवींना वेगवेगळ्या दिसणाऱ्या चंद्राप्रमाणे निरनिराळ्या असल्या, तरी शेवटी प्रत्येकाचा एकमेव ठरलेला चंद्र असतो, तशा खासगी. अगदीच ढोबळ उदाहरण म्हणून, मर्ढेकरांची या गंगेमधि गगन वितळले वाचून मला हटकून बाणगंगेचा तलाव आठवतो. कुणाला थेट गंगा नदी आठवेल, कुणाला कविताच आवडणार नाही. एखादी कविता वाचून त्यातून आलेला अनुभव लक्षात घेऊन लिखाण करणं महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येकाच्या गाठीला आलेले अनुभव ही वेगवेगळे शिवाय ही अनुभव ग्रहण करण्याची प्रत्येकाची पार्श्वभूमी काळाप्रमाणे बदलत जाते, हा भाग वेगळाच. आजचे नवीन अनुभव मग आपल्या पिंडाचा भाग बनतात. त्यामुळे आज एखादं पुस्तक/कविता आपल्याला जशी आवडली तशीच्या तशीच ती आपल्याला दहा वर्षांनी आवडणार नाही. जर आपल्याच आवडीत एवढा फरक पडू शकतो, तर दोन व्यक्तींच्या आवडी जुळणं हे अधिक कठीण, पण असं असलं, तरी याचंही एक उलट टोक आहे. अनुभव जसे वैयक्तिक असतात, तसेच वैश्विकही असतात. वाचनातून आपण लेखक/कवीचे अनुभव व्हिकॅरियसली जगायचा प्रयत्न करतो, पण त्याचवेळी आपल्या पूर्वसंचितातल्या अनुभवाशी सांगड घालायचाही कुठेतरी नकळत प्रयत्न करत असतो. आपण कधीच न घेतलेले अनुभव (उदा. रारंगढांग) जसे आपल्याला आवडू शकतात, तसेच त्याउलट जिथे जिथे आपली येथीचा जिव्हाळा तेथे बिंबे सारखी स्थिती होऊन ज्या अनुभवांशी आपण एकरूप होऊ शकतो तेही बेहद्द आवडतात.

काशीबाई कानिटकर, लक्ष्मीबाई टिळक अशा लेखिका मराठी साहित्यात लिहित्या झाल्या तरी स्त्रीवादाची खरी मुहुर्तमेढ रोवली ती मालतीबाई बेडेकरांनी. १९३३ मध्ये विभावरी शिरुरकर या टोपणनावाने त्यांनी कळ्यांचे नि:श्वास हा कथासंग्रह लिहून मराठी साहित्यविश्वात खळबळ माजवली. मुळात स्त्रीवादाचा पाया हा स्त्रीला वेगळे अस्तित्व आहे, वेगळे व्यक्तिमत्व आहे ही मान्यता मिळवण्यात आहे. केवळ स्त्री असल्याने वेगळी वागणूक मिळावी असा नाही. ‘बाबांचा संसार माझा कसा होणार?’ या कथेत एक मुलगी, बहीण, पत्नी, सून, आई म्हणून इतरांनी आपल्याकडे पाहू नये, तर एक स्वतंत्र विचारी व्यक्ती म्हणून पहावे हा त्याकाळी धाडसी वाटणारा विचार कथानायिका मांडू पाहते. एका अर्थी मालतीबाई बेडेकर ह्या काळाच्या पुढे होत्या. विश्राम बेडेकरांच्या एक झाड दोन पक्षी या आत्मचरित्रात त्याची चुणूक दिसते. मराठी साहित्यात बरेच असे स्त्रीवाद झाले ज्यामुळे त्या काळात बऱ्याच चर्चा झाल्यात. त्यांच्या लिखणाच्या स्वातंत्र्याला अनेकदा काही ना काही कारण देऊन त्यावर गदाही आणण्यात आली.

मराठी साहित्याला घेऊन अनेकसे युक्तिवाद आजही पाहायला मिळतात. कारण मराठीला नोबेल कधी मिळणार किंवा मराठी साहित्यात शेक्सपिअर-टॉलस्टॉय-टागोर कसे निर्माण होतील, या विषयावर अनेक हेमंत-वसंत-शिशिर व्याख्यानमाला रंगतात. परिसंवाद झडतात. त्यासंदर्भात पेंडशांचे विचार महत्त्वाचे आहेत. संपूर्ण समाज ढवळून काढणाऱ्या, जुन्या जीवनपद्धतीला मोडीत काढणाऱ्या कितीशा घटना महाराष्ट्रात घडल्या? रशियन राज्यक्रांती, दोन्ही महायुद्धे किंवा फाळणी यासारख्या घटनांचा थेट परिणाम असा आपल्या जीवनावर झालाच नाही. (हे सारं, ‘अ = ब इतकं सोपं नाहीच. उद्या महाराष्ट्रात मोठी उलथापालथ झाली तर त्यामुळे लगेच उत्कृष्ट साहित्य निर्माण होईल, असे नाही.) हे एक कारण, आणि बहुजन वर्गाला अजून मराठीत लेखन करता येत नाही आणि अभिजनांना इंग्रजी अधिक जवळची वाटते, त्यामुळे वेगवेगळ्या व्यवसायांतले लोक आणि त्यांचे अनुभव मराठीत अजूनही म्हणावे तितके येत नाहीत, हे दुसरे.

आताच्या पिढीने मात्र ह्या प्रकारात जास्त लक्ष दिलेलं दिसत नाही, आधीच्या काळात कला हा प्रकार विरंगुळा आणि करमणुकीचा भाग नसून, त्यामार्फत समाजप्रबोधन हा त्यामागचा एक उद्देश होता. तेव्हाच्या काळातील माणसं आवडीने सगळ्या लोककलांना प्रतिसाद देण्यासाठी आवर्जून येत असत. बरेचदा काही लोकांनी पैशांसाठी आणि प्रसिद्धी ह्याकरिता हा मार्ग अवलंबला पण त्यांना त्यात पुरेसं यश आलं नाही त्यामुळे वाईट बोलून, ह्या सगळ्याला नावं ठेवून सगळं सोडूनदेखील दिलं. तेव्हा कलाप्रकाराला घेऊन संवाद करणं हीदेखील खूप मोठी गोष्ट मानली जायची, परंतु आता हे सगळं खूपच सोप्पं झालं आहे. त्या काळात चालणारे दशावतार, व्यावसायिक नाटकं ही प्रसिद्धी किंवा मानधन ह्यावर अवलंबून नसत, तर त्या मागे मनोरंजन हा उद्देश असायचा. सध्या बदलत्या जगात वेगाने मनोरंजनाची साधनं बदलत आहेत, त्यामुळे कला साहित्य हा एक दुय्यम पर्याय म्हणून पहिलं जातो. ज्या गोष्टींचा आपल्याकडे वारसा हक्क आहे त्या गोष्टीला आज समाजात पुरेसं स्थान न मिळणं ही खूपच आश्चर्याची बाब आहे. पिढी पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या मागे लागून त्यात वाहत चालली आहे. त्यांना त्या पलीकडलं जगच दिसेनासं झालंय की काय असं वाटू लागतं आणि त्यांना आता ह्या गोष्टींची जाणीव करून देईपर्यंत गोष्टी हातातून निसटून जातात की काय असं वाटू लागतं. शेवटी बोरकरांची एक कविता आठवते.

असणे आता असत असत

नसण्यापाशी अडले आहे,

जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत

बरेच चालणे घडले आहे.

माथ्यावरचा आभाळबाबा

सवाल आता पुसत नाही,

पृथ्वी झाली पावलापुरती

अल्याड पल्याड दिसत नाही.

– प्राजक्ता नाईक

क(शा)ला

काही कला अशा असतात की त्यांचं भव्यत्व पाहून डोळे दिपून जातात. काही अशा असतात ज्यात कलाकाराचं कौशल्य पाहून, आपण आपलं भान हरवून बसतो. काही वेळा असं वाटतं की आपल्यासमोर जे काही घडतं आहे ते आपल्याला कधीच निर्माण करता येणार नाही. समोरील कलाकाराचं खूप कौतुक वाटतं. आपल्या समोर असलेल्या तेजस्वी व्यक्तिमत्वाकडे पाहून स्वतःबद्दल न्यूनगंड येतो. एखादा नट कौशल्याने लफ्फेदार भाषा वापरून, एखादं भारदस्त वाक्य म्हणतो. एखादा गवय्या कुठल्या तरी कठीण रागात दाणेदार ताण घेतो आणि अचूक समेवर येतो.

शास्त्रीय संगीतात रसिकाला वरील सगळे अनुभव देण्याची क्षमता आहेच, परंतु शास्त्रीय संगीतात असंही काहीतरी आहे, जे आजच्या मास प्रॉडक्शनच्या काळात, दुसरीकडे कुठेही सापडत नाही. मनाशी मनाचा संवाद साधण्याची क्षमता! ह्या संगीताला जरी शास्त्रीय असं लेबल असलं, तरीही हे संगीत नेहमीच स्वतःला मुख्य प्रवाहापासून वेगळं ठेवत आलेलं आहे. शास्त्र समजून घेऊन, त्यातून मिळालेली शिस्त वापरून, हे संगीत नेहमी स्वतःला बदलत आलेलं आहे. इतक्या बदलात आणि एवढ्या मोठ्या परंपरेच्या वलयातूनदेखील ह्या संगीताने आपल्याला असे कलाकार नेहमी दिले आहेत जे खरं गातात!

आजच्या पोस्ट ट्रूथच्या काळात ह्या संगीतात असं काहीतरी आहे, जे माणसाला परंपरेच्या लेण्यात राहून स्वतःला शोधण्याची संधी देतं

आजचा काळ वेगळा आहे. कलेचं प्रयोजन बदलतंय. टीव्ही आणि मोबाईलमुळे निरर्थक मनोरंजन आणि पोकळ सौंदर्याचे प्रयोग वाढतायत. एखादा कलाविष्कार त्यातल्या सौंदर्याचं रसग्रहण करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याबद्दल दुसऱ्यांशी बोलता यावं म्हणून पाहिला जातो. मला असं जाणवतं की ह्या सगळ्या गोतावळ्यात सोप्पं, सुंदर आणि प्रामाणिक असं सादरीकरण कमी झालंय.

बरेच अभ्यासकदेखील शास्त्रीय संगीताचा विचार करताना “शास्त्रीय” ह्या शब्दाचा “संगीत” ह्या शब्दापेक्षा जास्त विचार करतात. मला शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणात दोन प्रकार आढळून येतात. एक तो ज्यात राग स्वर आणि ताल ह्याचं पक्कं गणित दाखवलं जातं. सूर पक्का असतो, तान भिंगरीसारखी जाते आणि लयीच्या गतीला सुमार नसतो. खूप मजा येते, गाणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यालासुद्धा. कार्यक्रम संपतो. दुसरा दिवस उजाडल्यावर कालच्या कार्यक्रमाचे फक्त आवाज आपल्या कानात घुमतात. त्यानंतर तेदेखील नाहीसे होतात आणि आपल्याला ते गाणंच आठवेनासं होऊन जातं. दुसरा सादरीकरणाचा प्रकार फारच कमी ऐकायला मिळतो. मला असं वाटतं ख्याल संगीत ज्यासाठी निर्माण झाल आहे, ते ह्या प्रकारात साध्य होतं. गायकाच्या मनात दडलेलं काहीतरी तो रसिकांसमोर उघडं करतो. त्याचा ‘ख्याल’ मांडतो. कर्नाटक गायक टी. एम्. कृष्ण म्हणतात, “खरं संगीत तिथेच घडतं, जिथे कलाकार स्वतःचं मन उघडं करतो. त्यासाठी त्याला स्वतःच्या कोषाबाहेर यावं लागतं.”

ख्यालाचे सुंदर कार्यक्रम झाले की मनात काहीतरी बदलतं. शब्दांचे अर्थ जागे होतात आणि राग दिसायला लागतो. हळू हळू ते अर्थ निरर्थक होत जातात आणि फक्त आशय शिल्लक राहतो. असं प्रामाणिक सौंदर्य कमीच फार क्वचित संगीताच्या दुनियेत दिसतं.

कुमार गंधर्व ह्याबद्दल असा परखड प्रश्न विचारतात , “आपल्याला सुंदर दिसता येतं, आपल्याला सुंदर गाताही येतं, आपण ह्याचा विचार का करत नाही!?” न बोलता बरंच काही बोलून जाण्याची क्षमता ह्या कलेत प्राबल्याने आहे.

आपल्या आयुष्यात असे काही काही क्षण येतात. आपण कोणाशीतरी बोलण्यात मश्गुल असतो आणि त्या व्यक्तीकडे बघत तिचं ऐकतंच राहतो, भोवतालचे आवाज शांत व्हायला लागतात. माणसांची आणि विचारांची गर्दी विरून जाते. समोरची व्यक्तीदेखील नाहीशी व्हायला लागते, फक्त बोलणं शिल्लक राहतं. कोणीतरी आपल्या समोर बसून गातं तेव्हा असंच काहीसं होत.

दिग्गज संगीत समीक्षक दीपक राजांशी बोलत असताना ते म्हणाले, राग, ताल, बंदिश ही सगळी निमित्तं आहेत. बैठकीत संगीत सादर करण्यामागचं खरं कारण वेगळंच असत. ”माहोल बनना चाहिये!!” निखळ सत्य नसेल, तर कुठल्याच कलेला तसा काहीही अर्थ उरत नाही.

 

– नील खोपकर

कल – कला, कलाकार व रसिकांचा !

 

मानवी इतिहासात मानवाने साक्षर होणे ही तुलनेने अलीकडची गोष्ट आहे. पहिले उपलब्ध असे लिखित साहित्य सुमारे सहा हजार वर्षांपूर्वीचे आहे. मौखिक परंपरेकडून लेखन परंपरेकडे, तिथून मुद्रण आणि नंतर इलेक्ट्रॉनिक परंपरेकडे असे मानवी इतिहासातील टप्पे आहेत. मौखिक ज्ञानाच्या परंपरेत, पद्याच्या निर्मितीचे प्रमाण जास्त होते. कारण पुढच्या पिढीपर्यंत ज्ञान पोहोचवण्यासाठी पद्य, लयबद्ध वाक्य लक्षात ठेवणे हे मानवी मेंदूसाठी तुलनेने सोपे असते. सुरुवातीला माणूस चित्रलिप्यांतून लिहीत होता. म्हणजे ‘कला’ मानवाच्या मूलभूत अभिव्यक्तीचे माध्यम आहे आणि अभिव्यक्त होणे ही माणसाची मूलभूत गरज आहे! प्रत्येक काळात ती असणारच आहे. मुळात कला ही संगीत, नाटक, चित्र, इत्यादींपुरतीच मर्यादित नसून, इतिहास-संशोधन, चित्रपट बनवणे, स्वादिष्ट जेवण बनवणे हीदेखील कलेचीच उदाहरणे आहेत. कलेची व्याख्या फार विस्तृत आहे.

 

”संगीत वह भाषा है, जो पूरी दुनिया समझती है।”

”A picture is worth a thousand words.”

 

कलेविषयी अशी कित्येक विधाने, सुविचार आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो. आजच्या काळाच्या संदर्भात ही विधाने तंतोतंत लागू होतात का? कलेविषयीचा दृष्टिकोन ह्यांना धरून आहे का?

‘आजच्या काळातील’ असे म्हणताना आपण भौगोलिक सीमासुद्धा लक्षात घेऊ. उदा. भारत. कारण जगातील कलेची माहेरघरं असणाऱ्या देशांमध्ये कलेविषयक अत्यंत व्यापक व सकारात्मक दृष्टिकोन असलेला हा देश. त्यामुळे आपल्या सभोवतालातील परिस्थिती कशी आहे ह्याचा थोडा विचार करू. प्रत्येक गोष्टीबाबतचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. त्यामुळे सरसकट सर्वांचा असा एकच दृष्टिकोन आहे, असा निष्कर्ष काढता येणार नाही. समाजशास्त्रज्ञ, कलाविषयक अभ्यासक, तत्त्वज्ञ आपापल्या काळातील व्यापक निरीक्षणांआधारे मते नोंदवत असतात. आपण जरा आपल्या सभोवतालचा विचार करू.

माझ्या भावाने यंदा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. सुरुवातीच्या दिवसांतलाच त्याचा अनुभव असा की त्याने विचारलेल्या प्रश्नांवर, “काय ‘आर्ट्स्’वाल्यांसारखे प्रश्न विचारता!” अशी प्रतिक्रिया मिळते. शाळेतल्या आमच्या वर्गातल्या ४५ विद्यार्थ्यांपैकी कलाशाखेत प्रवेश घेणारे फक्त तीन विद्यार्थी होते आणि ‘आर्ट’चा पर्याय तर एकानेही स्वीकारला नव्हता! चित्रकलेकडे शाळेतील एक त्रासदायक विषय ह्याहून वेगळ्या नजरेने पाहणारे कमीच असतात. मीसुद्धा कला शाखेत प्रवेश घेत असताना, “स्पर्धापरीक्षांची तयारी करायची असेल, तर हा निर्णय योग्य आहे!” अशा प्रतिक्रिया मिळायच्या. कलाकाराला आजही, “ते सगळं ठीक आहे, पण पोटापाण्यासाठी काय?” असा प्रश्न विचारला जातो. एका ब्राह्मण कुटुंबातील मुलीला ब्राह्मणच मुलगा शोधण्याची अट आहे, पण तो कलाकार नसावा ही त्याहून महत्त्वाची अट! आजच्या काळातील आपला सभोवताल!

”कलेचे यश कलावंताला मिळणाऱ्या स्वातंत्र्यावर अवलंबून असते” हा विचार विंकेलमान यांनी मांडला. त्या अनुषंगाने राष्ट्रस्तरावरील काही घटना विचारात घेऊ. २००६ साली म. फ़ि. हुसैन ह्यांनी भारतमातेचे नग्नरूपातील चित्र रेखाटले. हे चित्र एका प्रदर्शनात लावले गेले. ह्यावरून अनेक वाद झाले. कला जर अभिव्यक्तीचे माध्यम असेल, तर ह्या अभिव्यक्तीची घुसमट झालेली दिसून येते.

बोनाल्ड असे म्हणालेले, “साहित्य ही समाजाची अभिव्यक्ती असते.” ‘मधोरुबगन – अ सर्टिफिकेशन’ ही पेरुमल मुरुगन ह्यांनी २०१० साली लिहिलेली कादंबरी. ह्या कादंबरीतील आपल्या गावाच्या उल्लेखामुळे आपल्या जातीवर, स्त्रीवर, देवावर ताशेरे ओढले आहेत, अशा भावना सर्वांपर्यंत पोहोचवल्या गेल्या. लेखकाला धमक्या देण्यात आल्या, पुस्तकांच्या प्रती जाळल्या, बंदच्या घोषणा दिल्या. ह्या सर्वांचा परिणाम असा झाला की त्या लेखकाने यापुढे न लिहिण्याचा निर्णय घेतला! एका कलाकाराने आपली कला प्रस्तुत न करण्याचा घेतला! ह्याला कारणीभूत समाजाचा किंवा समाजातील एका विशिष्ट समूहाचा कलेविषयीचा संकुचित दृष्टिकोन! ही आजच्या काळातील उदाहरणे. ह्या काळात आपण स्वतःला उदारमतवादी, विचारांच्या बाबतीत आधुनिक म्हणवून घेतो, पण जर कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा असा असेल, तर आपला कल यांत्रिकीकरणाकडेच वाढत चालला आहे का असा प्रश्न उभा राहतो.

पण हे असं आणि एवढंच खरं असंदेखील नाही. काही दिवसांपूर्वी आमच्या महाविद्यालयात जलरंग चित्रकलेची कार्यशाळा घेण्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावरचे चित्रकार श्री. विकास पाटणेकर आले होते. पालक आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न वगैरे काहीच नसताना त्यांनी स्वतः काम करून, मेहनतीने पैसे कमवून, चित्रकलेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली. कलेप्रती त्यांच्या मनातील ओढ, कलेचा आदर ह्यामुळे ते आज आतंरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करू शकले! जून २०१९ मध्ये, दहावी – बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी आयोजित केलेल्या एका करिअर मार्गदर्शनाच्या परिसंवादात J. J. school of art चे डॉ. संतोष क्षीरसागर आले होते. २०१८ मध्येही ते ह्या परिसंवादात आलेले. क्षीरसागर ह्यांनी, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कला क्षेत्राकडे वळण्यासाठी इच्छुकांची संख्या बरीच वाढली असल्याचे निदर्शनास आणून दिले. सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे नकारात्मक उदाहरणांचे प्रमाण जरी वाढत असले, तरी साऱ्यांचा दृष्टिकोन काही नकारात्मक नाही.

आजच्या काळात आपली कला इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाज माध्यमांचा उत्तम पर्याय आपल्या हातात आहे. त्या साधनांचा वापर कसा करावा हीसुद्धा एक कलाच आहे म्हणा! नकारात्मकता वाढत आहे, कलेविषयीचा दृष्टिकोन संकुचित होत आहे असे म्हणण्याऐवजी मानवाला मिळालेल्या विचार करण्याच्या, अभिव्यक्त होण्याच्या क्षमतेचा वापर ज्या कलामाध्यमांमध्ये होतो, त्यांच्याकडे आदरानेच पाहिले जाईल, ह्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. डोळ्यांसारख्या नाजूक अवयवाची शस्त्रक्रिया करणे जरी शास्त्रावर अवलंबून असले, तरी ती एक कला आहे असे म्हणतात. मग आजच्या काळात जर कलेविषयीच्या दृष्टीची शस्त्रक्रिया करणे गरजेचे असेल तर ती कला आपल्याला अवगत असावी लागेल.

श्री. गिरीश कर्नाड म्हणाले होते, “मला अशा एका पिढीचा भाग असल्याचा आनंद वाटतो; ज्या पिढीमध्ये धर्मवीर भारती, मोहन राकेश, विजय तेंडुलकर आणि मी होतो! आम्ही एकत्रितपणे असा दावा करू शकतो की, आम्ही आधुनिक भारतासाठी राष्ट्रीय रंगभूमी निर्माण केली आहे.”

अशा प्रकारचे वाक्य आपल्या व ह्यापुढील प्रत्येक पिढीतील कलाकारांना बोलता यावे ह्यासाठी आजच्या काळातील आपली पिढी कलेची व्याख्या समजून घेऊन, कला व कलाकारांचा आदर करणारी असणे अत्यावश्यक आहे!

 

प्रज्ञा विद्याधर सावंत,

बोरीवली, मुंबई – ९१

सपंर्क क्र. ८२८६५५२७२५

I am text block. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.